पुणे – मागील महिन्यात मनपा प्रशासनाने नगर रस्त्यावर कारवाई करत अतिक्रमणे काढली. यात विमाननगर चौकातील जागेवरील अतिक्रमणेही काढण्यात आली. मात्र, कारवाई होताच, ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत एका बांधकाम व्यावसायिकाने या जागेवर पत्रे ठोकले आहेत.
संबंधित बांधकाम व्यावसायिकाने घेतलेल्या भूमिकेनंतर वहतूक कोंडी फोडण्यासाठीचा हा रस्ता बंदच झाला आहे. त्मुळे या चौकातील कोंडी आणखी वाढली आहे. या प्रकाराने पथ विभागाला धक्का बसला असून बांधकाम विभागाने तातडीने मालकी निश्चित करून हा रस्ता रिकामा करून द्यावा, बांधकाम व्यावसायिकास नोटीस द्यावी अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेच्या कार्यवाहीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून ही कारवाई रस्त्यासाठी केली का बांधकाम व्यावसायिकासाठी अशी चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकार ?
महापालिकेकडून शहरात १५ आदर्श रस्ते विकसित केले जाणार आहेत. जी २० अंतर्गत आलेल्या निधीतून हे काम केले जाणार असून त्यासाठी रस्त्यांचे आराखडेही तयार करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, अतिक्रमण कारवाई केल्यानंतर संबंधित ठिकाणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाय योजना केल्या जातात. विमाननगर चौकातही विमाननगर कडून आल्यानंतर नगर रस्त्याकडे पदपथावर अतिक्रमणे झाली होती. त्यावर कारवाई करत रस्ता रिकामा करण्यात आला. तसेच नंतर रस्त्याचे काम करण्यासाठी खोदाईही करण्यात आली.
मात्र, हे काम करताना ही जागा महापालिकेच्या ताब्यात आहे का ? नसेल तर कोणाच्या नावावर जागा आहे? याची खातरजमा करण्यात आली नाही. याच कालावधीत एका बांधकाम व्यावसायिकाने जागेवर दावा सांगितला आहे. आता ही कारवाई संबंधित व्यावसायिकाच्या फायद्याची ठरली आहे. ही अतिक्रमणे अनेक वर्षांपासून काढता येत नव्हती. मात्र, महापालिकेने चांगल्या उद्देशाने ती काढली असली, तरी या प्रकरणी आता प्रशासनाचीच अडचण झाली आहे.