पुणे – हुबळी-पुणे-हुबळी विमानसेवा सुरू झाली, त्याचे स्वागत आहे. मात्र, ज्या मार्गावर प्रवाशांची अधिक मागणी आहे, त्या पुणे-बेळगाव-पुणे विमानसेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी उपस्थित केला.
हुबळी-पुणे-हुबळी विमानसेवा आठवड्यातून चार दिवस आहे. बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याचा आनंद आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा बंद असून, ती अद्याप सुरू झालेली नाही. पुण्याहून हुबळीपेक्षा कर्नाटकची उपराजधानी असलेल्या बेळगाव साठी विमानसेवा सुरू करण्याची मोठी मागणी आहे. उद्योग-धंदे, शिक्षण, आयटी, बांधकाम आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांकडून या मार्गावर ही सेवा सुरू होण्याची वारंवार मागणी करूनही अद्याप सुरू झालेली नाही.
दरम्यान, बेळगावला जाण्यासाठी पुणे-हुबळी या विमानाचा पर्याय देखील फार काही व्यवहार्य नसून, प्रवाशांसाठी गैरसोयीचाच आहे. हुबळी विमानतळावरून बेळगावला गाडीने जाण्यासाठी दीड-दोन तासाचा अधिकचा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे बेळगाव-पुणे व पुणे-नाशिक या मार्गावरील बंद झालेल्या उडान योजने अंतर्गत फ्लाईट पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत असल्याचे वंडेकर यांनी सांगितले.