पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – परवानगी मिळत नसल्याने पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक (कार्गो) सेवा सुरू होत नव्हती. आता परवानगी मिळाली, जानेवारीमध्ये कार्गो सेवाही सुरू झाली आहे, तरी विमान कंपन्यांकडून कार्गोला जागा नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यात सिंगापूरला किरकोळ स्वरूपात, तर दुबईला एक किलोही माल पाठविण्यात आलेला नाही.
एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा जानेवारी २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. सध्या पुण्यातून सिंगापूर आणि दुबई अशा दोन आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहेत. त्यापैकी सिंगापूरला आतापर्यंत चार ते पाच टन कार्गो वाहतूक झाली आहे, तर दुबईला अद्याप एक किलोदेखील कार्गो पाठविण्यात आलेला नाही.
विमान कंपन्यांकडून विमानात कार्गोसाठी जागाच नसल्याची सबब सांगितली जात आहे. त्यामुळे पुण्यातून परदेशामध्ये माल पाठवण्यासाठी अडचणी येत आहेत. पुण्यात स्पाईट जेट, विस्तारा आणि एअर इंडिया यांना आंतरराष्ट्रीय कार्गोसाठी परवाना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही कार्गो वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे विमानतळ प्राधिकरणाने लक्ष द्यावे, अशी मागणी अनेक उद्योजकांनी केली आहे.
उद्योजकांची तक्रार
परदेशांमध्ये जलवाहतुकीद्वारे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते; पण गेल्या काही दिवसांपासून समुद्रामध्ये माल वाहतुकीवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अनेक जण हवाई वाहतुकीकडे वळले आहेत. मुंबईसह इतर अनेक आंतरारष्ट्रीय विमानतळावर शकडो टन माल वाहतुकीसाठी पडून आहे;
पण विमान कंपन्यांकडून कार्गोसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याची तक्रार उद्योजकांकडून केली जात आहे. दरम्यान, उन्हाळा सुरू झाला असून, आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशात आंब्यांची खूप मागणी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशात आंबा पाठविण्यासाठी विमान कंपन्यांनी जागा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.