पॅरिस – निगारागुआला जात असताना वाटेत फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेल्या विमानाला आज आपल्या पुढील प्रवासाची अनुमती देण्यात आली. मानवी तस्करीच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी या विमानाला फ्रान्सजवळच्या वेट्री विमानतळावर उतरवण्यात आले होते. गेल्या ३ दिवसांपासून या मानवी तस्करीच्या आरोपांची तपासणी फ्रेंच अधिकाऱ्यांकडून केली जात होती. या विमानात असलेल्या ३०३ प्रवाशांमध्ये बहुसंख्य भारतीय प्रवासी आहेत. या विमानाला पुढील प्रवासाची अनुमती देण्यात आल्याचे फ्रेंच प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
वेट्री विमानतळावरील या विमानाचा मुक्काम वाढवण्यासंदर्भात ४ न्यायाधीशांपुढे आज सकाळी सुनावणी झाली. त्यावेळी विमानातील सर्व प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. मानवी तस्करीच्या आरोपांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासाचा भाग म्हणून ही चौकशी केली गेली.
पुढील प्रवासाची अनुमती दिली गेल्यानंतर हे विमान आज सकाळी पुन्हा उड्डाण करण्यास सिद्ध झाले होते. हे विमान मुंबईला आणले जाणार आहे. निगारागुआ येथे जाण्यासाठी निघालेले किंवा दुबईवरून निघालेले प्रवासी देखील भारतात थांबू शकतात.
फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही प्रवासी हिंदी किंवा तमिळ भाषा बोलत होते. या प्रवाशांनी आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. एकूण प्रवाशांपैकी १० प्रवाशांनी फ्रान्स सरकारकडे राजकीय आश्रय मिळण्यासाठी विनंती केली असल्याचेही समजते आहे.
या विमानामध्ये ११ अल्पवयीन प्रवासी प्रौढ सहप्रवाशांविना प्रवास करत आहेत. तर २ प्रवाशांना कोठडीमध्ये घेण्यात आले आहे. त्यांच्या कोठडीची मुदत शनिवारी संध्याकाळी ४८ तासांनी वाढवण्यात आली होती, असे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे विमान रोमानियाच्या लिजंड एअरलाइन्स या मालवाहू विमान कंपनीच्या मालकीचे आहे. कथित मानवी तस्करीमध्ये या विमान कंपनीचा कोणताही हात असल्याचा आरोप कंपनीच्या वकिलांनी फेटाळून लावला आहे. प्रवाशांची कागदपत्रे तपासण्याचे काम अन्य भागीदार कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी ४८ तास आगोदर प्रवाशांच्या पासपोर्टची माहिती विमान कंपनीला कळवण्यात आली होती, असे या वकिलांनी सांगितले. फ्रान्सच्या कायद्यानुसार मानवी तस्करीच्या गुन्ह्याला २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
फ्रेंच धन्यवाद…
विमानातील भारतीय प्रवाशांची काळजी घेण्यासाठी भारतीय दूतावासातील कर्मचारी शनिवारी विमानतळावरच मुक्कामाला थांबले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी फ्रेंच अधिकारी नाताळच्या सुटीच्या दिवशीही अव्याहत काम करत असल्याबद्दल भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये त्यांना धन्यवाद दिले आहेत.