पुणे – दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे त्याचा थेट परिणाम विमान सेवेवर होत आहे. या धुक्यामुळे पुणे ते दिल्ली विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे विमानतळ प्रशासनाने केले आहे.
खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्लीसह उत्तर भागातील प्रयागराज, राजकोट, अहमदाबाद या सहा विमानांची उड्डाणे रविवारी (दि. १४) सकाळी रद्द करण्यात आली. तर दुपारनंतर आणखी चार विमानांसह दक्षिणेकडील चेन्नईला जाणारे एक विमान उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे एकूण १० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. वारंवार विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पुणे ते दिल्ली विमानसेवेला मोठी पसंती आहे. रोज अनेक उड्डाणे दिल्ली साठी होत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने विमान सेवेवर आणि रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. राजधानी दिल्लीत रविवारी धुक्याने जनजीवन विस्कळीत झाले. दाट धुक्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली असून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक तास प्रवासी विमानातच अडकून पडले होते. खराब हवामानामुळे विमाने उड्डाण करू न शकल्याने विमानतळावर विमानांच्या रांगा लागल्या होत्या.
उत्तर भागातील हवामान दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे पुण्यातून दिल्लीकडे जाणारी विमान उड्डाणे सातत्याने रद्द करण्यात येत आहे. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी (दि.१४) रोजी देखील अशीच स्थिती निर्माण झाली. परिणामी, १० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे सुमारे सहाशेच्या घरात प्रवाशांचा नियोजित प्रवास थांबला. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कडाक्याच्या थंडीबरोबरच दाट धुक्याचा सामना
दिल्लीत रविवारी किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअस खाली आले आहे. त्यामुळे रविवार हा या हंगामातील सर्वात थंड दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीबरोबरच दिल्लीकरांना दाट धुक्याच्या दुहेरी हल्ल्याचाही सामना करावा लागत असून त्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.