उद्यापासून तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
निमोणे – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तशीच तयारी शिरूर तालुक्यातील करडे येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचीही सुरू आहे. ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहेत, त्याच दिवशी करडे गावात श्रीराम मंदिराचाही लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येत ज्या दिवशी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले त्याच दिवशी करडे गावातीलही श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. करडे ग्रामस्थांनी साधलेल्या या धार्मिक योगायोगाची तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता, हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ या कार्यक्रमानिमित्त तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करडे ग्रामस्थांनी केले आहे. शनिवारी (दि. 20) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता प्रधान संकल्प, गणपती पूजा, पुण्यवचन, वसुंधरा पूजा, मूर्ती जलाभिषेक मुखदेवता पूजा दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजता श्री मुर्तीची ग्रामप्रदक्षिणा रात्री 9 ते 11 अशोक महाराज जाधव (आकुर्डी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी (दि. 21) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजता अग्निस्थापन, नवग्रहदेवतापूजन, होमहवन विधी, देवांच्या मुर्तीना अभिषेक रात्री 9 ते 11 भागवताचार्य महेंद्र महाराज नलावडे (आळंदी) यांच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (दि. 22) सकाळी 10:04 वाजता देवांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सकाळी 11:39 वा. कलशारोहण समारंभ हस्ते एच. बी. पी. माधव महाराज इंगोले (आळंदी) दुपारी 12 ते 2 वा. हरि कीर्तन उत्तम महाराज बढे (आळंदी), दुपारी 2 वा. नंतर महाप्रसाद समस्त ग्रामस्थ करडे, लंघेवाडी, चव्हाणवाडी यांच्यावतीने महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या मंदिरासाठी एकूण एक कोटी रूपयांपर्यंत खर्च झाला असून आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या आमदार निधीतून 15 लाख रूपये दिले आहेत. बाकी सर्व रक्कम लोकवर्गणीतून उभी करण्यात आली आहे. मंदिरासाठी पाया भरणीपासून ते काम पूर्ण होईपर्यंतची सर्व जबाबदारी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष घायतडक, भाऊसाहेब पळसकर व सचिव शिवाजी शिंदे यांनी पार पाडली.
1843 साली या मंदिराची उभारणी
करडे गावात जे भव्य असे श्रीराम मंदिर उभे राहात आहे त्या जागी मोडकळीस आलेले जुने श्री राम मंदिर होते. इंग्रज राजवटीत शहीद खेमाजी जगदाळे (सुभेदार) यांचे स्मरणार्थ सरूबाई भ्रतार खेमाजी जगदाळे यांनी व गांवकरी मिळून शके 1843 साली या मंदिराची उभारणी केली होती. मंदिरासाठीची जागासुद्धा जगदाळे परिवाराने दान केलेली होती. सुभेदार खेमाजी जगदाळे हे लंघेवाडीचे माजी उपसरपंच वैभव जगदाळे यांचे खापर पंजोबा होत. या पूर्वीच्या मंदिराचा इंग्रज राजवटीत किरकोळ जिर्णोद्धार झालेला होता. त्यानंतर मंदिर मोडकळीस आले होते.