– राज्य शासनाला नियमावलीचा मसुदा सादर
पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पूर्वप्राथमिक शिक्षणात समानता आणण्यासाठी खासगी बालवाड्यांची मान्यता, किमान सुविधा, अभ्यासक्रम या संदर्भात नियंत्रण आणण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा शालेय शिक्षण विभागाने तयार करून तो मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर केला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी बालवाड्यांवर नियंत्रणाचे विधेयक मांडले जाणार आहे.
राज्यात शासकीय अंगणवाड्यांसह खासगी बालवाड्या गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात सुरू असतात. मात्र, त्यावर कोणतेही शासकीय नियंत्रण नाही. बालवाडी सुरू करण्यासाठीची मान्यता प्रक्रियाही सध्या अस्तित्त्वात नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पूर्वप्राथमिक शिक्षण आता शिक्षणाच्या चौकटीत आणण्यात आले आहे. पूर्वप्राथमिक ते दुसरीसाठीचा राज्य स्तरावरील अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता राज्यातील खासगी बालवाड्यांवर शासकिय नियंत्रण आणण्यात येणार आहे.
खासगी बालवाड्यांवर नियंत्रण आणण्याबाबतच्या नियमावलीचा मसुदा तयार करून काही दिवसांपूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आला. तज्ज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात मान्यता प्रक्रिया, अभ्यासक्रम, किमान सुविधा यावर भर देण्यात आला आहे.
खासगी बालवाड्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत समानता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या नियमावलीचे विधेयक तयार होऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे बाराशे हरकती-सूचना
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करून जाहीर केला होता. त्यावर हरकती, सूचना मागवल्या होत्या. या आराखड्यावर आलेल्या सुमारे बाराशे हरकती-सूचना विचारात घेऊन आता लवकरच अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.