सातारा – 1990 ला पदवीधर झालेले धनंजयराव गाडगीळ (डीजी) कॉलेजचे विद्यार्थी गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आले. प्रचंड उत्साहात हा सोहळा पार पडला. रिलायंसचे माजी अधिकारी हेमंत कदम व सहकारी मित्र उद्योजक सईद इनामदार, जयसिंह शिंदे, राजेंद्र राजे ,अनिल देसाई ,योगेश राजगुरू व मित्र परिवाराने 33 वर्षानंतर जुन्या सवंगड्यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला.
धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचे 1990 चे म्हणजे 33 वर्षा पूर्वी एकत्र कॉलेजचे विद्यार्थी हे एकत्र येणे सोपे नव्हते. त्याकाळी मोबाइल, इंटरनेट तसेच सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे कॉलेजमधून पदवीधर होऊन बाहेर पडल्यावर एकमेकांबरोबर संपर्क ठेवण्याची साधने अस्तित्वात नव्हती. नंतर काळाच्या ओघात प्रत्येकजण आपआपल्या मार्गाने मार्गक्रमण करत राहिला. मात्र कॉलेज जीवनातील मित्रांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाची होती. प्रत्येकजण काही ठराविक मित्रांच्या सानिध्यात असला तरी सर्वाना एकत्र करणे गरजेचे होते आणि ते मित्रसमुहाच्या माध्यमातून शक्य झाले.
पन्नाशी पार केलेले हे सर्व मित्र एकत्र आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह वाढवत होता. प्रत्येकाने आपला परिचय करून देताना कॉलेज काळातील शाब्दिक कोटयामुळे त्याला मिळणारी दाद ही कार्यक्रमाची रंगत वाढवत होती. आजपर्यंत कष्टाने घडवलेल्या कारकिर्दीचे मित्राकडून कौतुक होत होते. मित्रांच्यामधील मनमोकळेपणा पन्नाशी पार केलेल्या सर्वाना कॉलेज काळात घेऊन गेला. सर्वजण पुन्हा एकदा सर्वाबरोबर परिचित झाले. या कार्यक्रमाला नोकरी, व्यवसाय, शेती तसेच सर्व क्षेत्रात सध्या काम करत असलेल्या मित्राची उपस्थिती होती. सध्या शाहूपूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फड़तरे हेही 1990 च्या कॉलेजच्या बॅचचे असल्याने ते उपस्थित होते.
कार्यक्रमात 1990 च्या काळात असलेले प्राचार्य स्वामी,तसेच सहकारी मित्र प्रताप भुजबळ व इतर ज्या मित्रांचे निधन झाले आहे. त्या सर्वाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेट टुगेदरसाठी हेमंत कदम, धनंजय फड़तरे, जयसिंह शिंदे, सईद इनामदार, राजेंद्र राजे, अनिल देसाई, योगेश राजगुरु,शंतनु माचवे, भंडारे, संदीप संकपाळ, जितु शाह ,आनंद पाठकजी, रियाज कलाल, अजय शिर्के,संजय मांढरे, धनजंय जगताप, युवराज मोदी,दादा फरास, राजेंद्र घोणे, बिरबल इंगवले, अजय देवी, विजय पवार, रफीक पठाण, मानसिंग पवार, सागर काटकर, संजय काळभोर, तानाजी पाटील, अविनाश पवार, रफीक मोमीन, जोतिराम शेडगे, दिलीप चव्हाण, विकास नलवड़े आदी उपस्थित होते.