पुणे – शहरात गणेशोत्सवात निकृष्ट दर्जाचे तसेच अस्वच्छ मोबाइल टॉयलेट पुरवण्यात आल्यानंतर महापालिकेच्या नियोजनावर टीकेची झोड उठलेली आहे. महापालिकेने पुढील वर्षाच्या गणेशोत्सवासह, शहरात मोबाइल टॉयलेट पुरवण्यासाठी तब्बल 24 लाख 99 हजार 200 रुपयांची निविदा काढली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या निविदा एका ठराविक ठेकेदाराला देण्यासाठी इतर ठेकेदारांनी त्या भरू नयेत, म्हणून चक्क एका बड्या नेत्याचे नाव पुढे करत, इतर “ठेकेदारांना निविदा भरू नयेत’ असा थेट इशारा महापालिकेतील कर्मचारीच देत आहेत. निविदा दि. 7 ऑक्टोबर रोजी काढली असून, ती भरण्याची अंतिम मुदत दि. 14 ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला एवढी घाई कोणासाठी? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
यंदा गणेशोत्सवात शहरात मोबाइल टॉलयेट लावले होते. मात्र, यातील अनेक टॉयलेट स्वच्छ नव्हती. त्याला दरवाजे नव्हते, कड्यादेखील नव्हत्या. त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली. काही भागांत टॉयलेटबाहेर पाण्याचे ड्रम ठेवण्यात आले. या प्रकारामुळे या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
पालिकेकडून अहवाल मागवून याची तपासणी सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवास दोन आठवडे झालेला नसताही लगेच पुढील वर्षभर मोबाइल टॉयलेट पुरवण्याची निविदा काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 25 लाखांपर्यंत विभाग प्रमुख निविदा मंजुरीचे अधिकार असल्याने 24 लाख 99 हजार 200 रुपयांच्या निविदा काढत वरिष्ठांकडे ही मंजुरीसाठी जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
नेत्यांच्या नावाचा गैरवापर
ही निविदा मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयाची निविदा असल्याचे पालिकेतील संबधित कर्मचारीच ठेकेदारांना सांगत असल्याची जोरदार चर्चा आहे. पवार हे आपल्या सडेतोड कार्यशैलीमुळे ओळखले जातात. अनेकदा चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी ठेकेदारांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. असे असतानाच; त्यांचे नाव वापरून निविदांसाठी दबाव आणला जात असून पवार यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. महापालिकेत सध्या प्रशासक असल्याने नेत्यांची नावे वापरून मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळतील, याची पुरेपूर काळजी अधिकारी घेत आहेत.
महापालिका निरुत्तार
दरम्यान, या प्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकरणी संबधित अभियंत्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही निविदा पुढाच्या वर्षभरासाठी असेल असेही ते म्हणाले, मात्र, गणेशोत्सवात जवळपास 44 लाख तर पालखी सोहळयातही मोबाईल टॉयलेटवर जवळपास 10 ते 15 लाखांचा खर्च झालेला आहे. असे आसताना या दोन उत्सवांसाठीच मोबाईल टॉयलेटवर 50 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असताना 25 लाखात हे काम कसे होणार याबाबत त्यांना उत्तर देता आले नाही.