पुणे -शहरात 1 मेनंतर ज्येष्ठ नागरिकांसोबतच दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच 1 मेनंतर खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांकडून लस खरेदी करता येणार असल्याने महापालिकेकडून त्यांना लस पुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रिठे आदी उपस्थित होते.लसीकरणाच्या पाचव्या टप्प्याला दि.1 मेपासून सुरुवात होत आहे. या टप्प्यात 18 वर्षे वयावरील सर्वांना करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
प्रामुख्याने पहिला डोस घेतलेले 2 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक, 15 हजार आरोग्य सेवक, 45 हजार फ्रंटलाइन वर्कर यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. तसेच 1 मेनंतर राज्य सरकारकडून मिळलेला लसीचा कोटा फक्त महापालिकेच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरच वापरण्यात येईल, असेही मोहोळ यांनी नमूद केले.