पुणे – ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांचा पुण्यातील “संगीत रजनी’ कार्यक्रम रविवारी रात्री बरोबर दहाच्या ठोक्याला पुणे पोलिसांनी रोखला. कार्यक्रम सुरू राहिल्यास थेट तुमच्यावरच कारवाई करण्यात येईल, अशा इशाराच रहेमान यांना देण्यात आला. कायद्यापुढे कोणीही मोठे नसल्याचे पोलिसांनी दाखवून दिले. मात्र, यामुळे कार्यक्रमाला जमलेल्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला.
हा कार्यक्रम राजा बहादूर मिल परिसरात रविवारी सायंकाळी आयोजीत करण्यात आला होता. हा परिसर सायलेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. येथे अनेक रुग्णालये आहेत. यामुळे येथे कार्यक्रमाला सहसा परवानगी दिली जात नाही. परवानगी दिली तर काही अटी शर्थी घातल्या जातात.
रहेमान यांच्या कार्यक्रमालाही फक्त रात्री दहा वाजेपर्यंतच परवानी दिली होती. या कार्यक्रमामुळे दुपारपासूनच बंडगार्डन आणि पुणे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप होता. याआधी काही कार्यक्रमांमुळे अशाच वाहतूक कोंडीला नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता.
दरम्यान दहाच्या सुमारास रहमान “छैय्या छैय्या’ हे गाणे सादर करत होते. परवानगी वेळ संपताप बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी स्टेजवर गेले. त्यांनी वादकांना कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली. पोलीस स्टेजवर गेल्याने प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरवात केली. मग पोलिसांनी थेट रहमान यांच्याकडेच मोर्चा वळवला. पोलिसांनी त्यांनाच कारवाईचा इशारा दिला. यानंतर रेहमान स्टेजवरुन निघुन गेले.
बंडगार्डन पोलिसांचा पबबाबत हात अखडता
बंडगार्डन परिसरात होणाऱ्या “संगीत रजनी’ कार्यक्रमांबरोबर तेथील पबचाही त्रास नागरिकांना होत असतो. येथील काही पब निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असतात. तसेच त्यांच्या संगीताची आवाजही परिसरात घुमत असतो. शनिवारी आणि रविवारी पबला येणाऱ्या तरुणाईची गर्दी आणि धांगडधिंग्यामुळे परिसरात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली असते. मात्र बंडगार्डन पोलीस ठाण्यातील काही कर्मचारीच पब व्यवस्थापनाला मदत करताना दिसतात. त्यांचा राबता येथे दिवस रात्र असतो. हे त्यांच्या फेसबुकवरील छायाचित्रांवरुन दिसून येते. यामुळे कदाचीत बंडगार्डन पोलीस पबवर कारवाई करत नसावे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा –
https://www.facebook.com/reel/793677415456973