पुणे, दि. 15 -रोज साधारणः दीड कोटी कमाई करणाऱ्या पीएमपीने सोमवारी एका दिवसात दोन कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी 2016 मध्ये पीएमपीला एका दिवसात दोन कोटी पाच लाखांचे उत्पन्न मिळाले होते. पीएमपीचे नवीन अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांच्या उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांना यश आल्याचे या निमित्ताने दिसत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएल) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बस सेवा पुरविली जाते. यासाठी प्रशासनाकडे दोन हजारांहून अधिक बस आहेत. यामध्ये स्वमालकीच्या आणि ठेकेदारांकडून भाडेतत्वावर चालविण्यात येणाऱ्या बसचा समावेश आहे. सोमवारी (दि. 14) पीएमपीएलच्या एक हजार 657 बस मार्गावर होत्या. या माध्यमातून दोन्ही शहरांतील 12 लाख 99 हजार प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. या माध्यमातून प्रशासनाला दोन कोटी एक लाख 45 हजार एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. पीएमपीएल ताफ्यात सीएनजी आणि इलक्ट्रिक बस आहेत. यामध्ये इलक्ट्रिक बसची संख्या लक्षणीय आहे. साध्या बसप्रमाणेच तिकीट दर आकारण्यात येत असल्याने नागरिकांकडून इलक्ट्रिक बसमधून प्रवास करण्याला पसंती दिली जाते.
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, नोकरदार आणि महिला प्रवाशांकडून प्रवासासाठी पीएमपीला प्राधान्य दिले जात असल्याचे यावरून दिसत आहे. यामुळे प्रशासनाने दैनंदिन उत्पन्नात दोन कोटींचा टप्पा पार केला आहे.
पीएमपीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दैनदिन प्रवाशांची संख्या वाढली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून पासधारकांची संख्या देखील वाढत आहे. पीएमपीचा नेहमीच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे आणि राहिल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
सोमवारी मार्गांवर असलेल्या बसची संख्या – 1657
मिळालेले उत्पन्न ः दोन कोटी एक लाख 45 हजार
तिकीटामधून मिळालेले उत्पन्न ः एक कोटी 66 लाख 85 हजार
पासमधून मिळालेले उत्पन्न ः 34 लाख 58 हजार
आतापर्यंत विक्रमी उत्पन्न ः चार जानेवारी 2016 रोजी दोन कोटी पाच लाख