पुणे – बसस्टाॅपवर उभे राहिलेल्या प्रवाशाला सुरक्षित आणि स्वच्छ आसन व्यवस्था मिळावी, यासाठी पीएमपीकडून शहरातील मोडकळीस आलेल्या बसस्टाॅपचे सर्वेक्षण करून नव्याने १०० बसस्टाॅप उभारण्याच्या निविदेला नुकतीच मंजुरी दिली. या आधी ४०० बसस्टाॅपच्या निविदेला मंजुरी दिली असून, पुढील काही महिन्यात जवळपास पाचशे बसस्टाॅप प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
पीएमपीच्या ताफ्यात एकूण २०८९ बस आहेत. या बसच्या माध्यमातून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत सेवा दिली जाते. यामध्ये ३८१ संचलन मार्गावर बसस्टाॅपची संख्या हजारोंच्या घरात असून, दररोज एक लाखांहून अधिक प्रवाशी पीएमपी बसने प्रवास करतात. त्यामध्ये काही मार्गावर बसस्टाॅप चांगले आणि सुस्थितीत आहे.
मात्र, ज्या ठिकाणी बसस्टाॅप मोडकळीस आले, खराब झाले, त्याची पाहणी करून नव्याने एक हजार बसस्टाॅप उभारण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तीनशी बसस्टाॅप उभारण्याच्या निविदेला मंजुरी दिली असून, नुकतीच दोन टप्प्यात आणखीन २०० बसस्टाॅपच्या निविदेला मंजुरी दिली आहे. त्यानुसार बसस्टाॅप उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्टाॅप उभे राहिल्यावर होणार त्रास कमी होणार आहे.