पुणे -करोनामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची हिवाळी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 30 जुलै ते 17 ऑगस्टदरम्यान विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यापीठामार्फत हिवाळी 2020च्या परीक्षांचे 10 ते 30 जूनदरम्यान आयोजन करण्यात आले होते.
यादरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी “आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक होती. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यांना या परीक्षेस बसण्यास मनाई केली होती.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष परीक्षा आयोजित करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यापीठाला दिले आहेत. त्यानुसार या परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेच्या निकालानंतर उन्हाळी 2021 परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
“एमबीबीएस’ प्रथम वर्षाच्या परीक्षा वगळता आरोग्यशास्त्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षाही होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. परीक्षेबाबत सोशल माध्यमांतून जाहीर होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.