पुणे – समन्वयातूनच टंचाईवर मात शक्‍य

टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राम यांच्या सूचना


पीककर्ज, खरीप हंगामाच्या तयारीचाही आढावा

पुणे – जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीच्या सुरूवातीला तालुकानिहाय टंचाई आढावा घेतला. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चारा उपलब्धतेचे प्रमाण, आतापर्यंत केलेल्या कामाची सद्यस्थिती, उपलब्धता याचीही विस्तृत माहिती घेतली.

टंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, आवश्‍यकतेनुसार पाण्याचे टॅंकर वाढवावेत; जिल्हाधिकारी स्तरावर टॅंकरचे प्रस्ताव तत्काळ मंजूर केले जातील, असेही राम यांनी नमूद केले. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्‍यकतेनुसार टॅंकर भरण्यासाठी पर्यायी मार्गांचाही शोध घेण्यात यावा. जिल्ह्यात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास त्याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत. पिण्याचे पाणी, चारा टंचाईबाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही राम यांनी दिल्या. तसेच अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे. महत्त्वाची विकास कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत लघुसिंचन, लघुपाटबंधारे, यांत्रिकी, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, या विभागाकडून करण्यात येत असलेल्या जलयुक्‍त शिवार, गाळमुक्‍त धरण या बाबत विभागनिहाय कामांच्या सद्यस्थितीचा आणि खरीप हंगामात केले जाणारे खरीप/ रब्बी पीक कर्ज वाटप, खतांचे वाटप इ. कामे यांचा आढावाही राम यांनी घेतला.

यावेळी जिल्हयातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.