पुणे – चॉइस नंबरही आता ऑनलाइन

आरटीओकडून सुविधा : कामकाजाचा खोळंबा थांबणार

पुणे – दुचाकी आणि चारचाकी वाहनमालकांकडून आकर्षक वाहन क्रमाकांची मागणी करण्यात येते. वाहनमालकांना अपेक्षित असणाऱ्या क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये राबविण्यात येणारी “ऑफलाइन’ प्रक्रिया आता “ऑनलाइन’ करण्यात येणार आहे.

दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी नव्या मालिकेतील आकर्षक क्रमाकांची वाहनचालकांकडून वारंवार करण्यात येते. वाहन नोंदणीची नवी मालिका सुरू झाल्यानंतर वाहनमालकांकडून प्रामुख्याने 1, 111, 214, 1212, 1000, 9999 आदी विविध क्रमांकांची मागणी करण्यात येते. हे क्रमांक राखून ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येतात. ही प्रक्रिया पुणे कार्यालयामध्ये साधारणपणे दर महिन्याने राबविण्यात येते. या यंत्रणेमुळे परिवहन कार्यालयांचे कर्मचारी विनाकारण अडकून राहत होते. परिणामी, अन्य कामांसाठी कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांचा खोळंबा होत होता. अनेकदा या प्रक्रियेमुळे वाहननोंदणी थांबविण्याचे प्रकार देखील घडत होते.

नव्याने सुरू होणारी प्रक्रिया “अपडेट’ असल्याने संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या करता येणार आहे. आकर्षक क्रमांकासाठी नोंदणी करताना “ऑनलाइन’ अर्ज आणि नोंदणी शुल्क स्वीकारले जाणार आहे. यासह विशेष क्रमांकासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यास “ऑफलाइन’ पद्धतीने होणारा लिलाव देखील ऑनलाइन होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.

आकर्षक क्रमांकाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी दोन-तीन दिवस लागत होते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने वाहनमालक आणि कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ जात होता. नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. या विकसित प्रणालीमुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण देखील कमी होणार आहे. या प्रक्रियेची चाचणी सुरु असून, लवकरात लवकर नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत.
– संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.