पुणे – लक्ष्मी रस्त्यावरील एकेरी वाहतूक कॅन्टोन्मेंटपासून टिळक चौकापर्यंत (अलका टॉकीज) आहे. ती डेक्कनपासून कॅन्टोन्मेंट अशी करावी. सन 1992 पर्यंत ही व्यवस्था तशी होती. त्यामुळे आधीसारखेच करावे, अशी मागणी “पुणे व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
“लक्ष्मी रस्ता’ असे नामकरण होऊन 101 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्ता या रस्त्यांवरील तीन कि.मी. परिसरात “पुणे व्यापारी महासंघ’, “युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन’ आणि “पुणे सराफ असोसिएशन’ यांच्या विद्यमाने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचे उद्घाटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
यावेळी “पुणे व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, “युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन’ अध्यक्ष राजेश शेवानी, सचिव मिलिंद शालगर आणि “लक्ष्मी रस्ता सराफ असोसिएशन’चे अध्यक्ष योगेंद्र अष्टेकर आदी उपस्थित होते.
“लक्ष्मी रस्त्यावर केवळ पुण्यातूनच नव्हे, तर जिल्ह्यातूनही लोक खरेदीसाठी येतात. सन 1922 पासून या रस्त्याची ख्याती आहे. या रस्त्याला 101 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सर्व व्यापारी एकत्र आले आणि आकर्षक रोषणाई केली आहे. नागरिकांनी येथे येऊन खरेदीचा आनंद घ्यावा.” – विक्रम कुमार, आयुक्त, मनपा
इंग्रजांच्या काळात या लक्ष्मी रस्त्याला “ईस्ट-वेस्ट रस्ता’ म्हणत होते. 1921-22 मध्ये त्याचे “लक्ष्मी रस्ता’ असे नामकरण करण्यात आले. त्याला आज 101 वर्षे पूर्ण होत आहेत. या रस्त्यावर कापड, दागिन्यांची मोठीमोठी दुकाने आहेत. इंटरनॅशनल ब्रॅंडची दुकानेही येथे झाली आहेत. करोनामुळे या रस्त्याचे 100 वे वर्षे सेलिब्रेट करू शकलो नाही. त्यामुळे यावर्षी करत आहोत. येथे नागरिकांनी खरेदीसाठी यावे, ही विद्युत रोषणाई पाहून आपला अभिप्राय कळवावा. – फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ
“या “ईस्ट-वेस्ट रस्त्या’चे विस्तृतीकरण करावे. त्यासाठी एक लाख 75 हजार रुपयांची तरतूद करावी आणि या रस्त्याला “लक्ष्मी रस्ता’ असे नाव द्यावे, अशी नोंद 1921-22 मध्ये महापालिकेच्या (इंग्रजांच्या राजवटीतील शहराच्या दफ्तरात) दफ्तरी आहे.”- मिलिंद शालगर, सचिव, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन