पुणे – राज्य शासनाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तत्काळ मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने १ हजार कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. आणखीन एक हजार कर्मचारी नव्याने नियुक्त केले जाणार आहे.
दरम्यान, या सर्वेक्षणासाठी महापालिकेनेया पूर्वी पाठविण्यात आलेली यादी तपासणी न करताच शासनाकडे पाठविली असून या यादीत दोन महिने जुन्या यादीत महापालिकेच्या सेवानिवृत झालेले तसेच काही मृत कर्मचार्यांची नावेही आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम दिले आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी बैठक घेऊन त्याबाबतचे आदेश थेट महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेकडून माहिती मागवण्यात येत आहे. कमी कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी जास्त कर्मचाऱ्यांची यासाठी आवश्यकता आहे.
पालिका प्रशासनाकडून विविध खात्यातील १ हजार कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त केले आहेत. हे काम कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असेल. या कर्मचाऱ्यांची माहिती सरकारला पाठवण्यात आली आहे. मात्र, या कामाची व्यप्ती अधिक असल्याने तसेच तातडीनं काम पूर्ण करण्याची गरज असल्याने आणखी एक हजार प्रगणक नेमले जाणार असून या नावांची यादी तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले असून ही दुसरी यादी शासनास तत्काळ पाठविली जाणार आहे.
मृत सेवकांना पालिकेने केले जिंवत
महापालिकेत प्रत्येक महिन्याला कर्मचारी सेवा निवृत्त होतात. त्यामुळे कर्मचारी निवृत अथवा मृत पावल्यानंतर त्यांचे नाव यादीतून कमी होणे आवश्यक आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभागाकडून ऑक्टोबरअखेरपर्यंतच्या सेवकांची माहिती अपडेट केली असून त्यानंतर दोन महिन्यांची माहितीच अपडेट झालेली नाही. त्यामुळे पालिकेकडून दोन महिने जुनीच यादी देण्यात आल्याने अद्यापही ते कर्मचारी सेवेत असल्याचे समजून त्यांची यादीत नावे आली आहेत. यात सेवा निवृत तसेच मयत झालेल्या कर्मचार्यांची नावे असल्याने या प्रकरणी महापालिकेत एकमेकांवर टोलवा टोलवी सुरू आहे.