पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात मागील दोन दिवसांत लक्षणीय घट झाली आहे. 14 अंशांवर असलेले किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली आले आहे. यामुळे शहरातील थंडीचा कडाका वाढला आहे.
शहराच्या एनडीए, पाषाण भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली आले असून, पुढील दोन दिवस सकाळी धुके आणि थंडीचा कडाका वाढलेला असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत जात आहे. तसेच उत्तर भारतावर वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे मागील 48 तासांत राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. उत्तरेकडून येणारे वारे मध्य महाराष्ट्रात येत असल्याने पुढील दोन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा या भागातील किमान तापमान 8 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यातील माळीण येथे सर्वात कमी 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ एनडीए- 9.2, पाषाण- 9.3, हवेली- 10.1, शिवाजीनगर- 10.8, लवासा आणि बारामती- 11.4, लोणावळा- 11.6, पुरंदर- 11.8, आंबेगाव- 13.6, कोरेगाव पार्क- 15.7, मगरपट्टा- 16.5, वडगावशेरी- 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.