पुणे – नागरिकांच्या मिळकतकराचा गोंधळ कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना 2019 नंतर नव्याने कर आकारणी झालेली असल्यास अथवा पालिकेच्या सर्वेक्षणात भाडेकरू राहत असल्याने 40 टक्के सवलत कमी करून कराच्या रकमेत वाढ झालेली असली तरी तूर्तास चालू वर्षाची कर मागणीच भरण्यास मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतरही कर भरणा केंद्रांवर नागरिकांना थकबाकीसकट कर भरला तरच कर भरून घेतला जात असून जे नागरिक थकबाकी भरण्यास तयार नाहीत त्यांचा चालू वर्षाचा करच स्वीकारला जात नाही. त्यामुळे पैसे भरण्याची तयारी असूनही नागरिकांना घरचा रस्ता धरावा लागत आहे.
विशेष म्हणजे कर संकलन विभागाने हा गोंधळ थांबविण्यासाठी सर्व करसंकलन केंद्रावरील कर्मचाऱ्यांना केवळ या वर्षीचा कर भरून घेऊन सोबत पीटी3 अर्ज प्रशासनाने निश्चित केलेल्या दोन कागदपत्रांसह घ्यावा, असे स्पष्ट आदेश दिले असले तरी हा गोंधळ सुरूच आहे.
काय आहेत सुधारित सूचना
ज्या नागरिकांची निवासी मिळकतींची 40 टक्के कर सवलत पालिकेच्या जीआयएस सर्वेक्षणानंतर कमी झाली आहे. त्यांना, मागील वर्षी सवलत वगळून बील देण्यात आले आहे. हे बील एकूण बील म्हणून दर्शविले जात असले तरी, नागरिकांनी केवळ चालू वर्षाचा (करंट डिमांड) कर भरायचा आहे. तर ही रक्कम भरताना महापालिकेने पुढे सवलत कायम ठेवण्यासाठी तसेच मालक स्वत: राहत असल्यास थकबाकी कमी करण्यासाठी पीटी3 अर्ज भरून द्यावा लागेल. मात्र, त्यानंतर सोमवारी शहरातील अनेक कर संकलन केंद्रांवर नागरिकांना जुनी थकबाकी भरली तरच बील भरून घेणार असल्याचे सांगत कर भरून न घेताच माघारी पाठविण्यात आले आहे. या शिवाय, पीटी 3 अर्जासोबत सोसायटी एनओसीसाठी आग्रह धरला जात आहे.