पायाभूत सुविधा 6 महिन्यांत पूर्ण कराव्या लागणार
पुणे – महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापाठीने राज्यशासनाकडे शिफारस केली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या मान्यतेचा मोठा टप्पा पार पडला आहे. ही शिफारस करताना पुढील शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश देण्यास मुभा मिळाली आहे. मात्र, त्यापूर्वी महाविद्यालयाच्या आवश्यक पायाभूत सुविधा पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे दिव्य महापालिकेस पेलावे लागणार आहे.
या सुविधांमध्ये महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या, प्रयोगशाळा, शिक्षक आणि कर्मचारी नियुक्ती, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल, डॉ. नायडू रुग्णालयाची फेररचना, प्रवेश प्रक्रिया निश्चिती, महाविद्यालयासाठी आवश्यक बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.
यासाठी महापालिकेने पालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असली, तरी त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ सध्या अपुरे आहे. ते वाढवण्यापासून पालिकेस सुरूवात करावी लागणार आहे. हे महाविद्यालय साडेबारा एकर परिसरात असले, तरी त्यातील काही भागात अतिक्रमणही आहे.
पुढील वर्षभराचे नियोजन करतानाच दुसऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारीचेही नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेस या महाविद्यालयाच्या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा लागणार आहे. तर, पुढील आर्थिक वर्षात मोठी आर्थिक तरतूदहीपुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात करावी लागणार आहे.