वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील बकोरी रोडवर असलेल्या गुरुनानक फर्निशिंग वॉलपेपर अँड कार्पेट या वॉलपेपर, गादीचे काम करणाऱ्या छोट्या दुकानाला आग लागल्याची घटना बुधवारी (दि.११) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.
या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या चायनीज सेंटरला आगीची झळ बसली असून पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.
आगीच्या घटनास्थळाजवळ एलपीजी सिलिंडर असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांचा तत्पर प्रतिसाद आणि सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. हॉटेलमधील पडदे, वॉलपेपर, कार्पेट व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
दुकानाजवळच तीन एलपीजी सिलेंडर असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणखी पसरू नये म्हणून दुकानातील सिलिंडर बाहेर काढले. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.