पुणे – महापालिकेकडून मिळकतकराच्या थकबाकीपोटी सील केलेल्या मिळकतींमध्ये जवळपास 227 मिळकती अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, या मिळकतींचा लिलावही करता येत नसल्याने या मिळकतींच्या मालकांच्या इतर कर नोंदणी झालेल्या मिळकतींवर हा थकबाकीचा बोजा चढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
यावर्षी जवळपास 1753 मिळकती सील केल्या आहेत. या मिळकती अनधिकृत असल्याने पालिकेने त्यांना तीन पट कर आकारलेला असल्याने ही थकबाकी भरण्यात आलेली नाही. महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न 1500 कोटींवर गेले असून महापालिकेस 31 मार्च 2024 अखेरपर्यंत 2500 कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
मात्र, आधीच 40 टक्के सवलतीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने पालिकेने सील केलेल्या मिळकतींचा लिलाव सुरू केला आहे. त्या अंतर्गत यावर्षी सुमारे 1753 मिळकती सील केल्या. मिळकतीवर बोजा चढवून लिलाव करत 57 कोटींची थकबाकी वसूल करणार आहे,
यातील सुमारे 202 मिळकतींचा लिलाव सुरू केला आहे. त्याच वेळी 227 अनधिकृत मिळकतींची थकबाकी जास्त असली तरी लिलाव करणे शक्य नाही. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.
थकबाकी इतर मिळकतीतून वसूल करणार
याबाबत बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, या मिळकती अधिकृत करणे शक्य नाही. त्यातच त्या अनधिकृत असल्याने त्याचा लिलाव करता येणार नाही. त्यामुळे या मिळकती कारवाई करून काढल्या जातील.
तसेच त्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी या मिळकतधारकांची शहरातील इतर नोंदणी असलेली मिळकत बिलाच्या माहितीवरून शोधून त्या आधारे इतर मिळकतीवर थकबाकीचा बोजा चढवून कर वसूल केला जाईल.