सकल मराठा समाजाच्या सभेमुळे नियोजन
पुणे -सकल मराठा समाजाकडून सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) खराडीतील महालक्ष्मी लॉन येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेस मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत. सभेला होणारी गर्दी विचारात घेऊन नगर रस्त्यावरील वाहतुकीत सोमवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे-मुंबईकडे जातील. नगर रस्त्यावरून हडपसर, सासवड आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केसनंदमार्गे थेऊर फाटा येथून इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी थेऊर येथून इच्छितस्थळी जावे.
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांनी भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे. वाघोली येथून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद राहणार आहे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
बागेश्वर महाराज सत्संगानिमित्त बसथांब्यांचे तात्पुरते स्थलांतर
बागेश्वर महाराज यांच्या श्री हनुमान कथा संत्सग कार्यक्रमाचे आयोजन सोमवारपासून (20 नोव्हेंबर) संगमवाडीतील निकम फार्म येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त संगमवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारपर्यंत (22 नोव्हेंबर) बदल करण्यात आले आहे. या भागातील प्रवासी वाहतूक करणारा खासगी बस थांबा खराडी येथे तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडहून संगमवाडीतील थांब्यावर येणाऱ्या खासगी बस खडकी, होळकर पूल, येरवडामार्गे खराडी जकात नाका येथे जातील. नगर रस्त्यावरून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या खासगी बस नगर रस्ता,येरवडा, होळकर पूल, खडकीमार्गे इच्छितस्थळी जातील. गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या खासगी बस शिवाजीनगर, वेधशाळा चौक, संगम पूल, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर सेतू यामार्गे नगर रस्त्याकडे जातील.
गर्दी विचारात घेऊन वाहतूक बंद
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून संगमवाडी पूलमार्गे येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी. संगमवाडीत होणारी गर्दी विचारात घेऊन आवश्यकता भासल्यास पाटील इस्टेट ते येरवड्यातील सादलबाबा चौक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस आयुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.