pune news – लोणी काळभोर येथील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या ३ सराईत गुन्हेगारांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. एक जण फरारी असून पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची ही ९९ वी कारवाई आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात टोळी प्रमुख वैभव ऊर्फ गोट्या राजाराम तरंगे ( वय २०, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली ), सागर अरुण सिन्हा (रा. उरुळी कांचन ता. हवेली ) यांना अटक करण्यात आली असून यश लोणारी ( रा. तुपेवस्ती, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही.) हा फरारी आहे.
वैभव तरंगे हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. सदर टोळीवर मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करताना दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत करुन घरात अतिक्रमण करणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
हि कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त, आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, शिवशांत खोसे, अंमलदार तेज भोसले, संदीप धनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.