नवी दिल्ली – अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी ( Gautam Adani Group ) यांच्या समूहाने देशातील आणखी एक वृत्तसंस्था विकत घेतली आहे. यावेळी त्यांनी आयएएनएस इंडिया प्रा. लि ( IANS India Pvt. Ltd ) या वृत्तसंस्थेवर कब्जा केला आहे. हा व्यवहार नेमका किती रकमेत झाला ते मात्र गुप्त ठेवण्यात आले आहे. या आधी अदानींच्या समुहाने एनडीटीव्ही हा महत्वाचा वृत्तवाहिनी समुह ताब्यात घेतला होता.
गेल्या वर्षी मार्च महिन्यातच अदानी समुहाने मीडिया ( Adani Buy media ) व्यवसायात पदार्पण केले होते. आणि केवळ वर्षाच्या अवधीतच या समुहाने या क्षेत्रात आपले मोठेच वर्चस्व निर्माण केले आहे. सुरूवातीला त्यांनी क्विंटिलियन बिझनेस मीडिया विकत घेतला होता, हा समुह व्यवसाय आणि आर्थिक बातम्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइमचे संचालन करतो. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्यांनी एनडीटीव्हीचे ६५ टक्के शेअर्स विकत घेऊन या समुहावरही ताबा मिळवला होता. आता त्यांनी आयएएनएसवर नियंत्रण मिळवले आहे. ( Gautam Adani )
अदानी समुहाशी मोदी सरकारचा घनिष्ट संबंध राहिला आहे. त्यावरून देशात मोठेच राजकीय वादंग माजले आहे. पण त्यानंतरही या समुहाने एकामागून एक या पद्धतीने देशातील विविध कंपन्या विकत घेतल्या आहेत.
१९८८ मध्ये केवळ एक कमोडिटी व्यापारी असलेले अदानी यांच्या समुहाने आत्तापर्यंत देशातील १३ बंदरे आणि आठ विमानतळांसह पायाभूत सुविधांमध्ये भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. या समुहाने कोळसा, ऊर्जा वितरण, डेटा सेंटर्स ,सिमेंट आणि तांबे उत्पादन अशा क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ५ जी स्पेक्ट्रमचे परवानेही त्यांनी मिळवले आहेत.