पुणे- प्रभाग रचनेमुळे राष्ट्रवादीला सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याची संधी असली, तरी कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संमिश्र सूर असल्याचे समोर आले आहे. निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाच्या कमी अधिक बाजू पाहता ही भूमिका मांडली जात आहे.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सोमवारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चेसाठी बैठक बोलविली होती. या बैठकीत आघाडीवरून संमिश्र सूर उमटल्याचे सांगण्यात आले. तर आघाडीबाबत पक्षाचे नेते अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. पण, प्रत्येकाने जास्तीतजास्त नगरसेवक महापालिकेत निवडून आणत सत्ताबदल करून मोठा पक्ष राष्ट्रवादीच राहिल, यासाठी प्रयत्न करण्यावर एकमत झाले.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वबळाचा नारा देत राष्ट्रवादीचे 122 नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला होता. तसेच स्वबळबाबत लवकरच पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी ही बैठक झाली. या बैठकीत प्रभाग रचना, स्वबळावर निवडणूक लढविणे, इतर पक्षातून पक्षात येणारे नगरसेवक, तसेच निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात, आघाडीबाबत संमिश्र भूमिका उमटली. आघाडी केल्यास पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही अशी भूमिका काही घेतली तर आघाडी झाल्यास पक्षाला फायदा होईल अशी भूमिका काही ज्येष्ठ नगरसेवकांनी मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.