पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका “स्किझोफ्रेनिया’ ग्रस्त (स्वमग्न) मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. बाणेर येथील अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा प्रकारणाचा उलगडा झाला नसतानाच, अशी घटना घडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. मात्र, काही तासांतच अपहरण नाट्यावर पडदा पडला. यामुळे पालकांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारती विद्यापीठ परिसरातून एका 13 वर्षीय स्वमग्न मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मिळाली होती. तिचे आई-वडील रोजंदारीचे काम करतात. ही मुलगी कोथरुड परिसरात एका नागरिकाला दिसली होती. तिने त्यांना घरी फोन करण्याची विनंती केली. त्यानुसार फोन लावण्यात आला. यानंतर तिला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले. तेथून पालक आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने “मी घरात एकटीच असताना एक व्यक्ती घरात आला. त्याने कपाटातून कपडे पिशवीत भरले. यानंतर मला दोन किलोमीटर चालत नेले. तेथे एका पांढऱ्या कारमध्ये बसवून कोथरुडला सोडले,’ असे सांगितले.
पोलिसांनी ही माहिती गांभीर्याने घेत तपासकार्य सुरू केले. पण, कपाटातील दागिने व इतर किंमती ऐवज तसाच असल्याचे त्यांना आढळले. मुलीलाही सुखरुप कोथरुड येथे सोडल्याने अपहरणामागचा उद्देश कळत नव्हता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले.
तेव्हा ही मुलगी एकटीच पिशवी घेऊन गुजर-निंबाळकरवाडी रस्त्यावरून चालत जाताना दिसली. यानंतर कात्रज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती रिक्षांना हात दाखवताना दिसली. यातील एक रिक्षाचालक थांबला होता. मात्र, त्याने तिला रिक्षात घेतले नाही.
यापुढे फुटेज मात्र पोलिसांना मिळाले नाही. पोलिसांनी पुन्हा तिला विश्वासात घेऊन संवाद साधला असता, तिने “कदाचित मी बसनेही गेले असेल,’ असे सांगितले. तिच्या पालकांशी संवाद साधला असता, त्यांनीही तिच्या अनेक गोष्टी लहानपणापासून लक्षात राहात नसल्याचे सांगितले. यामुळे अखेर अपहरणनाट्यावर जवळपास पडदा पडला आहे. मात्र, गुन्हा दाखल असल्याने पोलीस अद्यापही इतर शक्यता तपासत आहेत.