ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन
पुणे : भारतीय संस्कृतीत तसेच सर्वच धर्मांच्या मुळाशी मूल्यनिष्ठा हे सूत्र आढळते. समाजाला चांगली दिशा द्यायची असेल तर मूल्यांशी, तत्त्वांशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी सरहद संस्थेच्या वतीने काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या आठव्या ललदेद राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
यंदाचा २०२४चा ललदेद राष्ट्रीय पुरस्कार १९९२ बॅचच्या केंद्र सरकारच्या सेवेतील आयआरएस अधिकारी निरुपमा कोटरू यांना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पद्मश्री प्राणकिशोर कौल, जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त जसमितसिंग धांद्रा, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीत मूल्य विचार महत्त्वाचा मानला गेला आहे. धर्म ही मूल्य जोपासण्याची एक प्रक्रिया आहे. मूल्य जोपासण्याचा भाव सर्वच धर्मांनी अधोरेखित केला आहे. व्यक्तीच्या कामाचा पाया मूल्याधिष्ठित असेल तर तो स्वतःबरोबर समाजालाही चांगली दिशा देतो. ललदेद यांनीही याच मूल्यांची भाषा करत मनांना जोडण्याचे काम आयुष्यभर केले, असे फिरोदिया म्हणाले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ललदेद ज्या काळात काश्मीरमध्ये होऊन गेल्या त्याच काळात महाराष्ट्रात संत परंपरा नांदत होती. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी समाज जागृतीचे काम केले. शिवयोगिनी लल्लेश्वरी पासून ते शेख नरुद्दिन ऊर्फ नंद ऋषी या संत कवीनीं काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. हेच काम आपल्या इथल्या संत परंपरेनेही केले आहे.
स्वतःला ओळखण्याची ताकद कला, साहित्य आणि संस्कृतीत असते. हे सांगताना त्यांनी ललदेदच्या ओळी उधृत केल्या. कोणतीही व्यक्ती संस्कृतीचा घटक असते. मी कोण, का आलो, हे समजून घेण्यासाठी हीच संस्कृती त्याला मदत करते. माझ्याही बाबतीत असेच म्हणता येईल. मी नोकरी म्हणून नाही तर पॅशन म्हणून माझ्या कामाकडे पाहते.
स्वतःला अधिकाधिक ओळखण्याची ती एक संधी असते. त्यामुळेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयात नाट्य, कला, नृत्य या क्षेत्रात मी जे काही केले त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले, असे कोटरू म्हणाले. सूत्रसंचालन साची मोरे यांनी केले, तर शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.