पुणे : ज्यांच्या कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत, त्या संबंधित नागरिकांना पाहण्यासाठी या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरुपात प्रसिद्ध करण्यात याव्यात, असे आदेश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे. पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश डॉ. देवरा यांनी दिले आहेत.
आॅनलाइनही करता येणार पाहणी
कुणबी नोंदी तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेमध्ये जिल्ह्यात सुमारे 2 लाख 58 हजार इतक्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत.