शरद पवारांवर टीका केल्याने समर्थकांचे कृत्य
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याचा आरोप करत लेखक आणि वक्ते नामदेवराव जाधव यांना काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत तोंडाला काळे फासले. ही घटना शनिवारी नवी पेठ परिसरात घडली.
मराठा आरक्षण विषयावरून नामदेवराव जाधव यांनी कथित दाखला दाखवत शरद पवार हे “ओबीसी’ प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे. याबरोबरच त्यांनी काही वादग्रस्त विधाने केली आहेत. दरम्यान, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत जाधव हे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. तेथे घुसून काळे फासण्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता.
मात्र, संशोधन संस्थेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी डेक्कन पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. त्यामुळे हा कार्यक्रमच रद्द करावा लागला होता. त्यानंतर जाधव हे नवी पेठेत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी पवार समर्थकांनी जाधव यांची धरपकड करत त्यांच्या तोंडाला काळे फासले.
पवारांच्या समर्थनार्थ यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान पोलिसांनी जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले.
पोलिसांत तक्रार करणार
“विचारांना उत्तर हे विचारांनी दिले पाहिजे. पण, लोकशाहीत अशी गुंडगिरी चालणार नाही. या प्रकरणी मी विश्रामबागवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे,’ असे नामदेवराव जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.