पुणे – मैत्रिमध्ये दुरावा निर्माण झाल्याने एका तरुणीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. तीला फिरायला नेण्याचा बहाणा करत भाटघर धरण परिसरात हे कृत्य करण्यात आले. तरुणी मिसींग झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी गुन्हयाचा छडा लावला.
मनिषा गेडाम(29,रा.अमरावती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सागर गुंडवर (30,रा.अमरावती) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मनिषा व सागर हे महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. मनिषा बीए आणी सागर बीकॉम एकाच महाविद्यालयातून झाले आहेत. नोकरीनिमीत्त मनिषा पुण्यात आली होती. ती चंदननगर येथे पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. तर सागर अमरावतीतच एका खासगी कंपनीत कामाला होता. तो अमरावतीवरुन अनेकदा तीला भेटायला येत होता. दरम्यान घटनेच्या दिवशी(13 मार्च) रोजी सागर अमरावतीवरुन दुचाकी घेऊन तीला भेटायला आला होता.
त्याने महत्वाचे बोलायचे असल्याचे सांगत तीला दुचाकीवरुन भाटघर धरण परिसरात आडबाजूला नेले. तेथे त्यांच्यामध्ये काही वाद झाल्यावर त्याने डोक्यात दगड घालून तील खून केला. यानंतर दुचाकीवरुन त्याने अमरावती गाठली. दरम्यान मनिषा रुमवर न आल्याने तीच्या मैत्रिणीने ती मिसींग झाल्याची तक्रार चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपासात तीच्या घरच्यांनी तीचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवून सागरवर संशय व्यक्त केला होता.
सागर ऍट्रोसिटीच्या गुन्हयात होता अटक
घटनेपुर्वी सागरने मनिषाच्या अमरावती येथील घरात जाऊन तोडफोड केली होती. याप्रकरणी त्याच्यावर चांदुर बजार पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्हयात त्याला चांदुर बाजार पोलिसांनी अटक केली होती. चंदननगर पोलिसांनी त्याला वर्ग करुन घेत पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडी दरम्यान त्याने मनिषाचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे चंदननगर पोलीसांचे पथक तीन ते चार वेळा भाटघर धरण परिसरात गेले होते. मात्र त्यांना मनिषाचा मृतदेह सापडला नव्हता.
सागरला अटक केल्यावर त्याने मनिषाचा खून केल्याचे ठिकाण दाखवले. तेव्हा तीथे मनिषाच्या मृतदेहाचा सापळा आढळला. सोबत कपडले, स्कार्फ आणी मोबाईलही होता. खूनाला 18 दिवस झाल्याने तीचा मृतदेहाचा सापळा झाला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख(परिमंडळ 4) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव व पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्या पथकाने केली.