पुणे – शहरातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम तसेच वाहतूकीबाबत जनाजगृती करण्यासाठी महापालिकेकडून फुले नगर येथील महापालिकेच्या इंद्रप्रस्थ उद्यानाच्या सुमारे साडेचार एकर जागेत ट्रॅफिक पार्क उभे केले जाणार आहे.
एका खासगी कंपनीच्या माध्यमातून तब्बल १५ कोटींचा खर्च करून सीएसआर अंतर्गत हे पार्क उभारले जाणार असून केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी मदत देण्यात येणार असून त्यांच्याकडूनही याबाबत काही सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांनी दिली.
पहिली पाच वर्षे हे पार्क उभारणारी कंपनीच त्याची देखभाल दुरूस्ती तसेच संचलन करणार असून त्यानंतर ते महापालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. हे उद्यान शहरातील वाहतूकीचे थीम पार्क असणार असून त्याच पध्दतीने त्याची रचना केली जाणार आहे.
सायकलींचे शहर असलेल्या पुणे शहरात गेल्या दोन दशकांमध्ये खासगी वाहनांचा आकडा लक्षणीय स्वरूपात वाढला असून वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषणाची समस्याही वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन जनाजगृतीसाठी हे पार्क उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालयाच्या जवळच हे पार्क असल्याने शिकाऊ वाहन परवाना घेण्यासाठी येणार्या उमेदवारांना या पार्कचा मोठा फायदा होणार आहे.
असे असेल उद्यान
– वाहतूक नियमनाचे माहिती फलक
– वाहतूकीशी संबधित प्रशिक्षण सुविधा
– जड तसेच हलक्या वाहनांचे सिम्युलेटर
– मुलांसाठी स्वतंत्र ई- वाहन सैर
– वाहतूक नियमांचा वाहन ट्रॅक
– कॅफेटेरिया
– लहान मुलांसाठी मनोरंजनातून वाहतूक शिक्षण