सातारा – जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, त्यासाठी राज्यस्तरावरुन अधिकचा निधी दिला जाईल. तसेच जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने इको टुरिझमला गती दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ च्या राज्यस्तरीय बैठकीत काल पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, नियोजन समितीचे शशिकांत माळी आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा.
वाई मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला सर्वाधिक निधी देण्यात यावा, तसेच पर्यटन व प्रतापगडच्या विकासासाठी निधी मिळण्याची मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा. त्यासाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून इतर कामे करता येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच इको टुरिझममुळे पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यासाठी देखील आवश्यक निधी देण्यात येईल, असे सांगितले.
केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये प्रधानमंत्री स्कूल रायझिंग इंडिया, अमृत योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन, हर घर जल, ट्रॅव्हल फॉर लाईफ, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदींचा समावेश आहे. या केंद्राच्या योजनांची अभिसरणाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचे कौतूक…
सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे जिल्ह्यातील विविध विकास कामे व नियोजन आराखड्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण केले. यामुळे श्री. डुडी यांचे अजित पवार यांनी कौतूक केले. अशा पद्धतीने इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपले सादरीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगून तुमच्यासारख्या जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात गरज आहे. तुम्ही पुण्यात यावे अशी ऑफरही श्री. डुडी यांना श्री. पवार यांनी दिली.