पुणे – मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने राबविलेला बक्षीस उपक्रम अतिशय चांगला असून त्याद्वारे उत्पन्न वाढीसोबतच प्रामाणिक करदात्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे. ही योजना राज्यभरातील महापालिकांनी राबवावी यासाठी त्यांना सूचना केल्या जातील असेल सांगत, महापालिका पक्की बिझनेसमन, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेचे कौतुक केले.
महापालिकेच्या वतीने शहरातील नियमित कर भरणाऱ्या नागरिकांसाठी या वर्षी तब्बल 1 कोटी रूपयांची बक्षीस योजना राबविली होती. या 45 विजेत्यांना पवार यांना हस्ते शनिवारी बक्षिसांचे वाटप करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे उपायुक्त अजित देशमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते महापालिकेकडून 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या कचऱ्याच्या ई-वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले.
पवार म्हणाले, नागरिकांनी वेळेत मिळकतकर भरावा यासाठी प्रोत्साहन म्हणून 1 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत 6 लाख 60 हजार 785 मिळकतधारकांनी मुदतीत कर भरला. त्यामुळे मिळकतकर संकलनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 300 कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. या रकमेवर पाच टक्के व्याज मिळाले तरी ते 15 कोटी रुपयांचे होते. त्यातून 1 कोटींचे बक्षीस देण्याने कर वाढणार असेल तर राज्यातील इतर महापालिकांनीही हा उपक्रम राबवावा, असे सुचविणार आहे.