पुणे-मुंबई महामार्गालगतचा सेवा रस्ता उजाड!

रस्त्याची रखडपट्टी : तोडलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी स्थानिक आग्रही

…अन्यथा उपोषणाचा इशारा
नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले की, निर्माण कन्स्ट्रक्‍शनला सेवा रस्त्याच्या कामाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. या कामाची मुदत संपून वर्ष झाले तरी काम रखडले आहे. वाहन चालक व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक अथवा माहिती लावली नाही. सेवा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, सेवा रस्ता व पुलाचे त्वरित काम पूर्ण करून तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात वृक्ष लावावेत अन्यथा महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल.

वडगाव मावळ – येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या सव्वा दोन किलोमीटरच्या सेवा रस्त्यासाठी हजारो झाडांची वृक्षतोड केली. सेवा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून तोडलेल्या वृक्षांच्या जागेवर वृक्षारोपण करण्याची मागणी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली. अन्यथा रस्ता-रोको करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

वडगाव येथील 2.250 किलोमीटरचा सेवारस्ता तसेच कामशेत पुलाचे काम 17.88 कोटी रुपयांचे कामाचा निर्माण कन्स्ट्रक्‍शनला ठेका दिला. डिसेंबर 2016 मध्ये या कामाचा आदेश असून, 31 मे 2018 मध्ये काम पूर्ण करण्याची मुदत होती. कामाची मुदत संपून एक वर्ष झाले, तरी काम पूर्ण होत नाही. त्यात या ठेकेदारावर कामशेत (ता. मावळ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निर्माण कन्स्ट्रक्‍शनने महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हजारो वृक्षांची दिवसाढवळ्या तोड केली. वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाने केवळ 18 वृक्षांच्या तोडीसाठी परवानगी दिली होती. या रस्त्यासाठी अवाढव्य चिं च, आंबा, वड, पिंपळ, लिंब या सहा हजारो निलगिरी वृक्षांची तोड करण्यात आली. एकेकाळी वनराईने नटलेला महामार्ग ओसाड केला. त्या जागेत सेवा रस्त्याचे काम सुरू केले होते. ते काम दोन वर्षांपासून रखडले आहे. अपूर्ण केलेल्या सेवा रस्त्याच्या कामामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या सेवा रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार, महिला व नागरिकांची वर्दळ असते.

निर्माण कन्स्ट्रक्‍शनला सेवा रस्त्याच्या कामाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. सेवा रस्ता व पुलाचे त्वरित काम पूर्ण करून तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात वृक्ष लावण्याची मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे, कॉंग्रेस वडगाव शहराध्यक्ष गोरख ढोरे, कॉंग्रेस युवक वडगाव अध्यक्ष खंडेराव जाधव, कार्याध्यक्ष महेंद्र ढोरे, राष्ट्रवादी वडगाव अध्यक्ष राजेंद्र कुडे, राष्ट्रवादी युवक वडगाव अध्यक्ष भाऊ ढोरे यांनी केली. “एम. एस. आर. डी. सी. ई’च्या अभियंता नम्रता रेड्डी म्हणाल्या की, वनविभागाकडे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात वृक्षारोपण करण्यासाठी पाठपुरवा सुरू आहे. रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)