पुणे -“सकाळी सात वाजता सुरू होणारी मेट्रो सेवा सहा वाजता सुरू झाली, तर पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होईल,’ अशी मागणी नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. त्याबाबत दोघांनीही मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेट्रो सेवा सकाळी सहा वाजता सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता आदेश निघताच मेट्रो पहाटेपासूनच पुणेकरांच्या सेवेसाठी हजर होणार आहे.
वनाजपासून पुणे स्टेशन, रूबी हॉल, शिवाजीनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. त्यामध्ये पुण्यातून मुंबईला दररोज ये-जा करणारे प्रवासी पुणे स्टेशन येथून डेक्कन आणि प्रगती एक्स्प्रेसने पुढे जातात. डेक्कन क्वीन सकाळी सात वाजता सुटते, तर प्रगती एक्सप्रेस 7 वाजून 50 मिनिटांनी निघते. मात्र, मेट्रो सेवा सातला सुरू होत असल्याने डेक्कन क्वीनच्या वेळेशी ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे मेट्रो सहा वाजता सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
चांदणी चौकाचे स्टार उजळले : चंद्रकांत पाटील
चांदणी चौकातील भव्य-दिव्य उड्डाणपूल पाहिल्यावर खऱ्या अर्थाने चांदणी चौकाचे स्टार उजळले आहेत. त्यामुळे नक्कीच येथील कोंडी सुटणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी नितीन गडकरी यांना “रोडकरी’ असे संबोधले होते. मात्र, आता राज्यासह देशातील हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे पसरले असून, गडकरींना आता “रोडकरी’बरोबर “विकासपुरूष’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.