पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी गजाआड केले. दोघांकडून ३० हजारांचे लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले. प्रशांत मधुकर वाव्हळ (वय २८, रा. इंदिरा वसाहत, ओैंध), ओंकार उद्धव भुजबळ (वय २८, रा. संकल्प पार्क, ओैंध) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सूरज जाधव (वय २३, रा. आळंदी रस्ता) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशखिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहेत. सूरज मेट्राे प्रकल्पावर सुरक्षारक्षक आहे.
आरोपी प्रशांत आणि ओंकार मध्यरात्री मेट्रो मार्गिकेच्या परिसरात आले. तेथील बांधकामासाठी ठेवलेल्या ३० हजारांच्या लोखंडी प्लेट टेम्पोत टाकून प्रशांत आणि ओंकार निघाले. सुरक्षारक्षक सूरज यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी दोघांना पकडले. त्यानंतर प्रशांत आणि ओंकार यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.