मुंबई – इस्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3′ मोहिमेतील अंतिम टप्प्यामध्ये विक्रम लॅंडरने चंद्राच्या भूमीवर यशस्वीपणे लॅंडिंग केले. भारताने चांद्रयान-3 मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत.
अखेर काल बुधवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केले. यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. या मोठ्या कामगिरीनंतर आता या ‘चांद्रयान-3′ वर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मिशन मंगलचे दिग्दर्शक जगन शक्ती हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाबाबत जगन शक्ती यांनी म्हणाले की, “आम्ही ही संधी जाऊ देणार नाही. मी आता या विषयावर थोडा विचार करत आहे. यासाठी इस्रोमध्ये कार्यरत असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीकडून मी काही माहिती घेत आहे. चांद्रयान 3 वर बनवल्या जाणार्या चित्रपटात मिशन मंगलमध्ये काम करणाऱ्या टीमलाच घ्यायचे आहे.” मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.
जगन शक्ती यांनी या मोहिमेच्या यशानंतर लगेचच चित्रपट बनविण्याचा विचार सुरू केला आहे. मिशन मंगल बनवण्याचे काम सुरू झाले तेव्हा देखील त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेतली होती. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत होता आणि विद्या बालनसह इतर अभिनेत्री देखील चित्रपटात दिसल्या होत्या. 2019 साली प्रदर्शित झालेल्या मिशन मंगल चित्रपटाने तब्ब्ल 200 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, शर्मन जोशी, अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट होती.