पुणे : मराठी अभिनेत्रीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या अभिनेत्रीने लग्नाची मागणी करताच तीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकीही देण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात सोलापूर येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ३२ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनूसार विराज रविकांत पाटील( ३५, रा.रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुध्द बलात्कार आणि आर्म ॲक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत फिर्यादी ही एक मॉडेल आणि उभरती अभिनेत्री आहे. तीने काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट अद्याप रिलीज व्हायचे आहेत. तीची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी बरोबर ओळख झाली होती. त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन लग्न करणार असल्याचे आश्वासन पिडीतेला दिले होते.
त्याच्यावर विश्वास ठेऊन तीने आरोपीशी संबंध ठेवले होते. मात्र तो लग्न करण्यास टाळाटाळ करत होता तसेच फोनही उचलत नव्हता. तीने त्याला प्रत्यक्ष भेटून ‘तु माझा फोन का उचलत नाहीत, घरच्यांशी भेट करुन का देत नाही? अशी विचारणा केली. याचा राग येऊन आरोपी विराजने तीच्या डोक्याला पिस्तूल लावत ‘ मी तुझ्या सोबत लग्न करणार नाही, पोलिसांकडे गेलीस तर मी तुला दाखवतोच मी कोण आहे’ अशी धमकी दिली. यानंतर तीला धक्का-बुक्की करुन हाकलून दिले. आरोपीने अनैसर्गीक अत्याचार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत आहेत.