पुणे – देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षातील इच्छूकांकडून तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक शाम मानकर यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेत पाठवण्यासाठी जोरदार बॅटिंग केल्याचं एका कार्यक्रमात पाहायला मिळालं आहे.
आमदार रवींद्र धंगेकर हे लोकांमध्ये रमणारे कार्यकर्ते आहेत. धडाडीने कामे मार्गी लावण्याची, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. असा माणूस जर लोकसभेचा उमेदवार म्हणून पुण्याला लाभला तर पुण्याचा झपाट्याने विकास होईल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक शाम मानकर यांनी केले.
रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना भेटण्याची तयारी ठेवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
दत्तवाडी येथील एमएसईबी ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न ५ हून अधिक वर्षांपासून रखडला होता. पण, या प्रश्नात काळजीपूर्वक लक्ष घालून अवघ्या ५ महिन्यात रवींद्र धंगेकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला. ४४ केव्ही आणि ३१५ केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर येथे बसवण्यात आले असून याचा लोकार्पण सोहळा शाम मानकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २६) झाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यास आमदार रवींद्र धंगेकर, सुधीर काळे, मनीष सूर्यवंशी, धनेश करपे, प्रदीप ग्रामपाध्ये, अतुल धांनडोरे, पल्लवी पवार, अभिजित बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मानकर म्हणाले, ज्यांना खरोखर लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, लोकांची कामे करायची आहेत, तो रात्रंदिवस झटतो. असा झटणारा माणूस आपल्याला रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने मिळाला आहे. ते पुणे शहराचे खासदार झाले तर अनेक प्रश्न मार्गी लागतील, याची मला खात्री आहे. त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी आणि मिळाल्यानंतर खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवूया. कारण आपल्याला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुण्याचा विकास घडवून आणायचा आहे.
नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद ही खरी दिवाळी
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर लोकांचा कार्यकर्ता म्हणून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र हजर आहे. यापुढेही हे सेवाकार्य अविरतपणे सुरूच राहील.” दत्तवाडी येथील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद हा खऱ्या अर्थाने दिवाळीतील आंनदासमान आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दत्तवाडीतील अंधार झाला नाहीसा
दत्तवाडी येथील एमएसईबीच्या ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न अनेक वर्षे रखडला होता. त्यामुळे वीज पुरवठा सातत्याने खंडित होत होता. नागरिकांना अंधारात रहावे लागत होते. हा प्रश्न आम्ही मार्गी लावू, असा शब्द निवडणुकीवेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार दत्तवाडी परिसरातील अंधार नाहीसा करून आमदार धंगेकर यांनी दत्तवाडी प्रकाशमान करून दाखवली. याबद्दल दत्तवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार रवींद्र धंगेकर यांचा खास नागरी सत्कार यावेळी केला. यानिमित्ताने आमदार धंगेकर यांच्या शब्दपूर्तीची अनुभूती ग्रामस्थांनी घेतली.