पुणे – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्याला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रामटेकडीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मेळाव्याचा समारोप राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते ९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. १८ व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात राज्यातील दहा पोलीस आयुक्तालय, तसेच नऊ परिक्षेत्रातील संघ सहभागी होणार आहेत. सीआयडी, राज्य दहशतवादी विरोधी पथक (एटीएस), राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, मुंबईतील फोर्स वनचा संघ मेळाव्यात सहभागी होणार आहे. मेळाव्यात राज्यभरातील पोलिसांचे २४ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील व्यावसायिक कौशल्य, नैपुण्य, कार्यक्षमता वाढविण्यासाठी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. तपासातील वैज्ञानिक सहाय, गुन्हेविषयक छायाचित्रण, ध्वनीचित्रीकरण, घातपात विरोधी तपासणी, संगणक जागरुकता अशा विभागात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी श्वानांचे सहाय घेण्यात येते. स्पर्धेत पोलिसांचे प्रशिक्षित श्वान सहभागी होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात मध्यप्रदेशातील भोपाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला होता. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्राच्या संघाने घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता, असे भुजबळ यांनी नमूद केले.