पुणे – फळाचे दुकान चालविण्यास घेतल्याच्या कारणावरून डोक्यात दगडू घालून मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे.जी.डोरले यांनी सुनावली. पूर्वी ते दुकान मारेकरी चालवत होता. तेच चालविण्यास घेतल्याने त्याने मित्राचा खून केला. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
अब्दुल कय्युम युसूफ अन्सारी (वय 39, रा. ओव्हाळवाडी, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. मित्र पोपट शिवराज गायकवाड (वय 50) याचा खून केला. पोपट यांची पत्नी काशिबाई (वय 45) यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी सहा साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शीची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.डी.परदेशी यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून प्रदीप कडूकर यांनी काम पाहिले. 30 एप्रिल 2018 रोजी वाघोली गावच्या हद्दीत ओव्हाळवाडी रोडला ही घटना घडली.
आरोपी अब्दुल आणि मयत पोपट मित्र होते. सुरूवातीला संतोषी नेपाळी ऊर्फ भाभीचे दुकान अब्दुल चालवित होता. भाभीने ते काढून पोपट यांना चालविण्यास दिले. हे दुकान चालविण्यास घेतल्याच्या कारणावरून अब्दुलने पोपट यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.