पुणे –करोनाकाळात काही खासगी रुग्णालयांनी बाधितांकडून अवाच्या सव्वा बिले आकारल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी महापालिकेच्या नेमलेल्या स्वतंत्र पथकाकडून करण्यात आली. आतापर्यंत 133 रुग्णांना 92 लाख रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत. रक्कम परत न केलेल्या 11 रुग्णालयांना अंतिम नोटीस पाठवण्यात आली असून परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मे ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जादा बिलाबाबत रुग्णांकडून खासगी रुग्णालयांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये जवळपास 11 रुग्णालयांबद्दलच्या 25 तक्रारी जून 2021 पासून प्रलंबित होत्या. अनेकदा पाठपुरावा करूनही महापालिकेच्या आदेशानुसार रुग्णांना पैसे परत देण्यात आले नव्हते.
संबंधित रुग्णालयांना दोनदा नोटीसही बजावण्यात आली. याशिवाय, स्मरणपत्रही पाठवण्यात आले. तरीही रुग्णांना रकमेचा परतावा न दिल्याने रुग्णालयांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. त्वरित रक्कम परत न केल्यास रुग्णालयांचे परवाने 6 महिन्यांसाठी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ज्या रुग्णालयांनी रुग्णांना बिलात जादा आकारण्यात आलेले पैसे परत केले नाहीत, त्यांना तिसरी आणि अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र रुग्णालयांना गुरूवारी पाठवण्यात आले आहे.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त
महापालिकेतर्फे आतापर्यंत 133 रुग्णांना 92 लाख रुपयांपर्यंत पैसे परत मिळवून देण्यात आले आहेत. ऑडिटमध्ये ही बिले तपासण्यात आली होती. ऑडिटपूर्वी आपण रुग्णांना जवळपास 6 कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत.
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका