नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 4 हजार 406 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांच्यापैकी 1 हजार 142 उमेदवारांविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. ते प्रमाण 26 टक्के इतके असून मागील वेळेपेक्षा 8 टक्क्यांनी अधिक आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने उमेदवारांनी अर्जांसमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रांची छाननी करून संबंधित माहितीचा अहवाल जारी केला. त्यानुसार, 889 उमेदवारांविरोधात (20 टक्के) गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. महिलांवरील अत्याचार, खून, खुनाचा प्रयत्न आदी आरोपांवरून अनेक उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
मागील वेळी (2017) उत्तरप्रदेश निवडणुकीच्या रिंगणात 4 हजार 823 उमेदवार उतरले. त्यांच्यापैकी 859 जणांविरोधात गुन्हे दाखल होते. ते प्रमाण एकूण उमेदवारांच्या 18 टक्के इतके होते.
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्यासाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. आता त्या राज्यात केवळ अखेरच्या टप्प्यासाठीचे मतदान बाकी आहे. अखेरच्या टप्प्यात 54 जागांसाठी 7 मार्चला मतदान होईल.