पुणे – महापालिकेकडून परवाना देण्यात आलेल्या सुमारे ६०० हून अधिक पथारी व्यावसायिकांनी पथारी शुल्क थकविले आहे. अनेकांनी त्याचे नूतनीकरण केलेले नाही. अशा पथारी सील करण्यासह त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.
अशा पथारी सील करण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू करण्यात आली असून, तुळशीबागेत महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवरून गोंधळ निर्माण झाला असला तरी थकबाकी असलेले तसेच परवाना कागदपत्र सादर न करणार्या व्यावसायिकांवर कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेकडून शहरातील सुमारे २१ हजार व्यावसायिकांना पथारी परवाना देण्यात आला आहे. या पथारी व्यावसायिकांना त्यांना नेमून देण्यात आलेल्या जागेनुसार पथारी शुल्क आकारले जाते. मात्र, अनेक व्यावसायिकांनी करोना कालावधी तसेच त्यानंतर महापालिकेचे पथारी शुल्कच भरलेले नाही. त्यामुळे पथारी शुल्काची थकबाकी ५६ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. त्यानंतर महापालिकेकडून शहरात वसूली मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर सुमारे चार ते पाच कोटींचे शुल्क महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे.
त्यामुळे वारंवार नोटीस देऊनही पथारी शुल्क भरले जात नसल्याने तसेच अनेकांनी पथारी विकत घेतल्यानंतर त्याचे परवाना नूतनीकरण करून घेतलेले नसल्याने महापालिकेने असे सुमारे ६०० स्टाॅल शोधले असून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.तर महापालिकेकडे कारवाई सुरू केली असली तरी पालिकेच्या शुल्काच्या पावत्या तसेच नोटीस मिळालेली नसल्याचे सांगत शहरात अनेक भागात पथारी व्यावसायिकांनी या कारवाईस विरोध सुरू केला आहे.