पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. 2) रात्री उशिरा देण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेच्या पीसीबी/ एमओबी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची दरोडा विरोधी पथक प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांची गुन्हे शाखेच्या पीसीबी/ एमओबी विभागात बदली करण्यात आली आहे.
नवीन वर्षाची सुरुवात अंतर्गत बदल्यांनी झाली आहे.
दरम्यान, शहरातील काही पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक पदे रिक्त आहेत. भोसरी, एमआयडीसी भोसरी, देहूरोड पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदे रिक्त आहेत. गुन्हे शाखा युनिट चार, युनिट पाच, सायबर शाखेसाठी देखील पोलीस निरीक्षक नाहीत.
वाहतूक शाखेतही हीच परिस्थिती आहे. तळवडे वाहतूक विभाग, तळेगाव वाहतूक विभाग, हिंजवडी वाहतूक विभाग, बावधन वाहतूक विभागाची मदार सहायक पोलीस निरीक्षकांवर आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे.