हडपसर (विवेकानंद काटमोरे) – साडेसतरानळी – मांजरी बुद्रुक दरम्यान असेलल्या अन्सारी फाटा येथे एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तर घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच सतर्क रहावे, असे आवाहन आमदार चेतन तुपे व वनाधिकारी यांनी केले आहे.
साडेसतरानळी येथील शेतकरी दत्तात्रय तुपे व अमर तुपे यांच्या शेतात गेली तीन – चार दिवसांत बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. तर आज शुक्रवारी (दि-१६ ) संध्याकाळी साडे सहा वाजता बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचे एका व्यक्तीचे म्हणणे आहे. सदर बिबट्या आढळून आल्याचे आमदार चेतन तुपे यांनी वनाधिकारी यांना कळविले. त्यांनी बिबट्या आढळून आलेल्या परिसराची कसून तपासणी केली. तुपे यांच्या शेतात उमटलेल्या ठशांची पहाणी केली असता ते ठसे बिबट्याचे असल्याचे आढळून आले.
बिबट्या दिसल्याची माहिती लोकांना सोशल मिडीयावरुन मिळाल्याने सर्व सतर्क झाले.गेली तीन- चार दिवसांत तुपे यांच्या शेतात हे ठसे उमटलेले दिसतात.तसेच या शेताच्या जवळच असलेल्या आरएमसी प्लांट वरील एका कामगाराला परवा पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्या सदृश प्राणी कुत्रा ओढत घेऊन जाताना दिसला त्यानंतर आज पुन्हा याच परिसरात बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
“साडेसतरानळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे व पाहिला असल्याची माहिती आमच्या कार्यालयात आली होती. त्यासोबत बिबट्याच्या पायाच्या ठस्यांची छायाचित्रेही पाठविली होती. आज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे पाहणी केली आहे. तेथे मिळालेले ठसे बिबट्याच्या पंजाच्या ठशांसी मिळते जुळते असल्याचे जाणवते. मात्र, त्याला लपण्यासाठी आवश्यक जागा तेथे नसल्याने तो एका जागी थांबू शकणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षेची काळजी घ्यावी. रात्री अपरात्री व एकटे शेतात जाऊ नये.आज रात्रीची गस्त घालण्यासाठी कर्मचारी पाठवले आहेत. याशिवाय उद्या सकाळी लवकर रेशक्यू टीमही जागेवर जाऊन पहाणी करणार आहे. –मुकेश सणस (वनपरिक्षेत्र अधिकारी ,पुणे)
नागरिकांनी सतर्क रहावे
साडेसतरानळी येथे गेले तीन दिवस बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी व काही ग्रामस्थांनी मला कळविले. त्यानंतर लगेचच ठसे उमटलेले फोटो आणि येथील परिस्थिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितली आणि आज संध्याकाळी वनविभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक तसेच शेतकरी यांच्यासमवेत बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करण्यात आली . नागरी वस्तीत आलेल्या या बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाला केली आहे. त्याच बरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. –चेतन तुपे पाटील (आमदार, हडपसर)
तो फोटो खरा की खोटा ?
सोशल मीडियावर काहीही अगदी क्षणात व्हायरल होऊ शकतं. एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत एखादा फोटो, व्हिडीओ किंवा पोस्ट जाते आणि ती व्हायरल होऊ लागते. हडपसर- साडेसतरानळी अन्सारी फाटा येथील शेतात उभा असलेला बिबट्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. अनेकांना हा फोटो नक्की खरा आहे की खोटा, याविषयी देखील प्रश्न पडले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. संबधीत व्यक्तीने एकच फोटो व्हायरल केला आहे. याशिवाय पुढे मोकळे शेत भरपूर आहे त्यामुळे अनेक फोटो काढले जावू शकले असते. दरम्यान या फोटो विषयी खात्री करून घेतली जाईल असे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.