पुणे-अन्य देशातून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या विमानतळावर आलेल्या सुमारे 1 लाख 14 हजार 446 प्रवाशांची आजपर्यंत आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये 16 हजार 617 जण अतिजोखमीच्या म्हणजे जेथे “ओमायक्रॉन’ चा संसर्ग आधीच मोठ्या प्रमाणात झाला आहे या देशांतून आले आहेत.
राज्यातील “ओमायक्रॉन’ बाधितांची संख्या 40 झाली आहे. त्यामुळेच मोठ्याप्रमाणात तपासणीही वाढवण्यात आली असून, परदेशातून आलेल्या प्रवाशांचे ट्रेसिंग करून त्यांच्या टेस्ट करण्यात येत आहेत. अतिजोखमीच्या देशातून आलेल्या 16 हजार 617 जणांशिवाय अन्य देशातून आलेले 97 हजार 829 प्रवासी आहेत. अतिजोखमीच्या देशांतून आलेल्या सर्वच प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, त्यांतील 45 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आले आहेत. तर इतर देशातून आलेल्यांपैकी 2 हजार 548 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली असून, त्यातील 16 जणांचे जिनोमिक सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपर्यंत “जिनोमिक सिक्वेन्सिंग’साठी पाठवलेल्या 525 नमुन्यांपैकी 79 अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.