पुणे, दि. 19 – शहरात अल्पवयीन मुली विकृत व्यक्तींच्या सावज ठरत आहेत. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलींची छेडछाड आणि अत्याचाराच्या घटना वाढल्याची नोंद झाली आहे. मुलीच्या सुरक्षिततेसाठी आई-वडिलांनी वेळीच विश्वासात घेऊन सजग करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आधी नंबर घेतला; मग घरात शिरला
घराजवळ सायकल शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची एक तरुण आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने छेड काढली. यानंतर तिचा मोबाइल नंबर जबरदस्तीने मिळवण्यात आला. फोन करुन घरात कोणी नसल्याची खात्री होताच दोन्ही आरोपी मुलीच्या घरात गेले. यानंतर तिला धमकी दिली. याप्रकरणी अभियांत्रिकी शिक्षण घेणारा सोहेल सय्यद (22, रा.गुरुवार पेठ) याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारावर खडक पोलीस ठाण्यात “पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि.29 ऑक्टोबर रोजी घडली. मुलगी घाबरलेली असल्याने तिने काही दिवस पालकांना याची माहिती दिली नव्हती. पालकांना माहिती मिळताच तक्रार दाखल करण्यात आली.
शाळकरी मुलीवर अत्याचार
शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साई गायकवाड (19) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दिली आहे. याप्रकरणी “पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वायकोळी करत आहेत.
शाळेच्या आवारात पालकावर हल्ला
शाळेच्या प्रवेशद्वारावर छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्याने टोळक्याने एका पालकावर कोयत्याने वार केले. या घटनेत उमेश खांदवे (40, रा.लोहगाव) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरच मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने खांदवे यांनी काही दिवसांपूर्वी टोळक्याला जाब विचारला होता. ते शुक्रवारी साडेपाचच्या सुमारास शाळेत आले होते. तेव्हा आरोपींनी खांदवे यांना मारहाण करत डोक्यात गज तसेच कोयत्याने वार केले. अशा प्रकारांनी शाळेच्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. शिवाय, पोलिसांचा वचक कमी झाला असल्याचाही हा दाखला असल्याची चर्चा या परिसरात आहे.
शाळेतील मुलीला पळवण्याचा प्रयत्न
शाळेत जाणाऱ्या मुलीला चहा प्यायला नेण्याचा बहाणा करत पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने आरोपीच्या हाताला झटका देऊन पळ काढला. तर ही घटना शाळेच्या सुरक्षा रक्षकाने पाहिल्यावर त्याने मुलीला वर्गात पोहवून वर्ग शिक्षकांना याची कल्पना दिली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सुजित रॉय नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले, “पीडित 11 वर्षीय मुलगी कर्वेनगर येथील एका शाळेत शिक्षण घेते. तर आरोपी शाळेसमोरच असलेल्या चहा सेंटरमध्ये काम करतो. तिची शाळा सकाळी साडेसातला असते, मात्र बस तिला पावणेसात वाजता शाळेत सोडून जाते. शाळा सुरू होईपर्यंत ती सुरक्षा रक्षकाजवळ बसते. दरम्यान, सुरक्षारक्षक चहा पिण्यास गेल्यावर आरोपीने मुलीला चहा पिण्यासाठी नेत होता. यानंतर मुलीने आरडाओरडा करत हात झटकून पळ काढला. तोवर सुरक्षा रक्षकाने आणि रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाने ही घटना बघितली. दुचाकी चालकाने सुजित रॉयला फटवल्यानंतर त्याने पळ काढला. वर्ग शिक्षकांनी पीडितेच्या आईला ही माहिती दिली.